सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने तंत्र उद्योजक घडवावेत: राज्यपाल .

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा


 पुणे, दि. १६ : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ हे भारताच्या आर्थिक विकासाला आणि राष्ट्रीय प्रगतीला हातभार लावणाऱ्या तंत्र उद्योजकांची, संशोधकांची आणि नवोन्मेषकांची नवी पिढी घडवणारे प्रमुख केंद्र बनू शकते, असे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी म्हटले. अभियंत्यांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता इतरांसाठी रोजगार आणि संधी निर्माण करणारे उद्योग, संस्था आणि तंत्रज्ञान विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्रा. सुनील भिरूड यांच्यासह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने नवोपक्रमाचे केंद्र व्हावे

सीओईपीचा वारसा जवळपास दोन शतकांचा असून या संस्थेने देशाला अनेक अभियंते, तंत्रज्ञ, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते दिले आहेत. त्यामुळे या वारशाचा उपयोग भविष्यातील भारतासाठी अधिक मोठे योगदान देण्यासाठी व्हायला हवा, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.

सीओईपीने केवळ पारंपरिक अर्थाने तंत्रज्ञान शिक्षण देणारी संस्था न राहता तांत्रिक विचार, संशोधन, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याचे जागतिक केंद्र बनण्याची महत्त्वाकांक्षा ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज देशासमोर स्वच्छ ऊर्जा, प्रदूषण नियंत्रण, जलसुरक्षा, शाश्वत वाहतूक, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि हवामान बदल यांसारखी अनेक आव्हाने आहेत. मात्र, या समस्यांकडे केवळ अडचणी म्हणून न पाहता त्यातून नवीन तंत्रज्ञान, व्यवसाय आणि संशोधनाच्या संधी निर्माण करण्याची गरज आहे.

रोजगार शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करण्यावर भर

अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळाल्यानंतर केवळ चांगली नोकरी मिळवण्याचे ध्येय ठेवू नये. स्वतःचे उद्योग, स्टार्टअप किंवा संस्था उभारून इतर तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याचा विचार करावा, असा संदेश राज्यपालांनी दिला.

भारताची अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत असताना कुशल अभियंते आणि तंत्र उद्योजकांची गरज वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी विद्यार्थी सीओईपीची मोठी ताकद

सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठाची सर्वात मोठी ताकद असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. देशाच्या विविध भागांत तसेच जगभरात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी हे संस्थेचे प्रभावी दूत आहेत.

माजी विद्यार्थ्यांचे ज्ञान, अनुभव आणि व्यावसायिक संपर्क विद्यापीठाच्या प्रयोगशाळा, विद्यार्थी आणि स्टार्टअप परिसंस्थेशी जोडल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अनुभवी मार्गदर्शक मिळतील आणि संशोधनातून प्रत्यक्ष व्यवसाय किंवा तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संधी वाढतील.

यातून नवीन गुंतवणूक, उद्योग आणि दीर्घकालीन सामाजिक परिणाम निर्माण होऊ शकतात, असे वर्मा यांनी सांगितले.

उद्योग, सरकार आणि विद्यापीठांनी एकत्र काम करावे

भविष्यातील विद्यापीठे एकट्याने काम करू शकणार नाहीत. शिक्षण क्षेत्र, उद्योग, सरकार आणि समाज यांनी एकत्र येऊन देशासमोरील समस्या सोडवण्यासाठी काम करण्याची गरज आहे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.

सीओईपीने देशातील आणि परदेशातील आघाडीची विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योग आणि स्टार्टअप्स यांच्याशी भागीदारी वाढवावी. संशोधन आणि उद्योग यांच्यातील अंतर कमी झाल्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि संशोधनाचा उपयोग समाजासाठी करता येईल.

विद्यापीठाने केवळ शैक्षणिक क्रमवारीत स्थान मिळवण्यापुरते मर्यादित न राहता संशोधन, पेटंट, तंत्रज्ञान हस्तांतरण, स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या क्षेत्रात देशातील आघाडीच्या संस्थांमध्ये स्थान मिळवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा

शिक्षण म्हणजे केवळ करिअर घडवण्याचे साधन नाही. समाजाच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी ज्ञानाचा वापर करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांची आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

दीक्षांत समारंभातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या गरजांचाही विचार करावा. तंत्रज्ञानाचा वापर सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सीओईपीमध्ये संशोधन आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सीओईपीकडून आयआयटीच्या दर्जाचे आणि समाजासाठी उपयुक्त संशोधन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. अधिकाधिक पेटंट मिळवणारे संशोधन विद्यापीठातून व्हावे आणि सीओईपीची विद्यार्थी संख्या भविष्यात १० हजारांपर्यंत पोहोचावी, असे त्यांनी सांगितले.

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विकसित करण्यावर सीओईपीने भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

सीओईपीच्या चिखली कॅम्पसमध्ये स्वतंत्र संशोधन व्यवस्था सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार आर्थिक मदत करणार असून सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थिनींसाठी ४०० क्षमतेचे वसतिगृह

सीओईपीच्या कॅम्पसमध्ये मुलींसाठी वसतिगृहाची कमतरता असल्याचे लक्षात घेऊन ४०० विद्यार्थीनींच्या क्षमतेचे नवीन वसतिगृह उभारण्याची घोषणा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

शासकीय निधीसोबतच सीएसआरच्या माध्यमातून या वसतिगृहासाठी निधी उभारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

ग्रामीण भागातील ज्या १० विद्यार्थिनींना वसतिगृहाचे शुल्क भरणे आर्थिकदृष्ट्या कठीण आहे, त्यांना दरमहा १० हजार रुपये याप्रमाणे १० महिन्यांसाठी एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही करण्यात आली.

याशिवाय ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत ५० विद्यार्थी-विद्यार्थिनींना कामाची संधी देऊन त्यांच्या खर्चासाठी दरमहा २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी दरमहा एक लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

मुलींच्या उच्च शिक्षणातील सहभागात वाढ

आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू नये यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी आठ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींचे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे पाटील यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी उच्च शिक्षणातील मुला-मुलींच्या संख्येत १६ टक्क्यांचा फरक होता. गेल्या वर्षी हा फरक साडेतीन टक्क्यांपर्यंत कमी झाला. यावर्षी उच्च शिक्षणात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला.

चिखली संशोधन केंद्रातून संशोधनाला नवी दिशा

विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै यांनी सीओईपीमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांसोबत मानवी कौशल्यांच्या विकासावरही भर दिला जात असल्याचे सांगितले.

भारत उत्पादन-केंद्रित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने मूलभूत संशोधन आणि उत्पादन विकासाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे सीओईपीने गेल्या काही वर्षांत संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

लवकरच चिखली येथे संशोधन संकुल सुरू करण्यात येणार आहे. हे संकुल पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन केंद्रांपैकी एक बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

विद्यापीठाशी अधिकाधिक उद्योग आणि स्टार्टअप्स जोडले जात असून काही कंपन्या सीओईपीसोबत संयुक्त संशोधन केंद्रे उभारण्यासही पुढाकार घेत आहेत. माजी विद्यार्थ्यांकडूनही विद्यापीठाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पै यांनी सांगितले.

दीक्षांत समारंभात १,४७१ विद्यार्थ्यांना पदवी

कुलगुरू प्रा. सुनील भिरूड यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदवी अभ्यासक्रमातील ८८९ आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ५८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

पदवी अभ्यासक्रमातील सुवर्णपदक विजेते आणि विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या १० विद्यार्थ्यांना, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सुवर्णपदक विजेत्या २५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

विद्यापीठाने अनेक नामांकित परदेशी विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांसोबत अभ्यासक्रम व शैक्षणिक सहकार्याबाबत करार केले आहेत. चिखली येथील संशोधन केंद्रामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्याला आणखी वेग मिळेल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला.

Followers