"नामस्ते डे" निमित्त पुणे महापालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान; सुरक्षा साहित्य व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.


पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे 14 जुलै 2026 रोजी 'NAMASTE Day' निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार तसेच गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी 14 जुलै हा दिवस 'NAMASTE Day' म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सफाई कर्मचारी, सांडपाणी व सेप्टिक टँक कर्मचारी, नाला सफाई कर्मचारी, कचरा वेचक तसेच इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.

पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेला हा कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी ऑडिटोरियम येथे पार पडला. कार्यक्रमादरम्यान सफाई कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा प्रावरणे (सेफ्टी गिअर) प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शहरातील सर्व महापालिका दवाखान्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. संतोष वारुळे, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त श्री. बाळासाहेब ढवळेपाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. साधना भांगरे तसेच विविध क्षेत्रीय कार्यालयांतील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम, सफाई सेवक, घनकचरा व्यवस्थापन विभागाची टीम आणि एच.एम.एस. टीम उपस्थित होती.

कार्यक्रमादरम्यान उपायुक्त श्री. संतोष वारुळे यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सफाई कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध अर्थसहाय्य योजनांचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली. सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आणि शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Followers