पुणे पोलिसांचा ‘Secure Horizon for Youth’ उपक्रम; अमली पदार्थांविरोधात जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित.

 


पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘Secure Horizon for Youth’ या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम 16 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता नेहरू स्टेडियम, स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात पार पडला.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच व्यसनमुक्त आणि सुरक्षित समाज घडविण्यासाठी सामूहिक सहभाग वाढविणे हा होता.

कार्यक्रमाला पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन संजय पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, तसेच पूर्व आणि पश्चिम प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (ANTF) चे अधिकारी, पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षकही कार्यक्रमात सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस सहआयुक्त संजय दराडे यांनी युवकांनी व्यसनापासून दूर राहून सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात युवकांनी व्यसनमुक्त राहून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे सांगितले.

यानंतर पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांनी सादरीकरणाद्वारे अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याची माहिती दिली. तसेच ANTF च्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थांचे सामाजिक परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत योग्य मूल्यांची जोपासना करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना करिअर, शिस्त आणि चांगल्या सवयी याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित लघुपटही दाखविण्यात आला. उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत स्वतः व्यसनापासून दूर राहण्याचा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प केला.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ‘Secure Horizon for Youth’ या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये अमली पदार्थांविरोधात प्रभावी जनजागृती निर्माण करून व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Followers