पुण्यातील पाणीपुरवठ्यावर पावसाचा परिणाम; नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन.

 


पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. अलीकडील मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये येणाऱ्या कच्च्या पाण्याच्या गढूळपणात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची गढूळता प्रकल्पाच्या निर्धारित शुद्धीकरण क्षमतेपेक्षा अधिक असल्याने ती पूर्णपणे नियंत्रित करणे सध्या शक्य होत नसल्याचे विभागाने सांगितले आहे.

तथापि, नागरिकांना वितरित करण्यात येणाऱ्या पाण्यावर आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निर्जंतुकीकरण (Disinfection) केले जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात कोणतेही रोगजनक जिवाणू राहणार नाहीत, यासाठी आवश्यक ती सर्व काळजी पाणीपुरवठा विभागाकडून घेतली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पावसामुळे कच्च्या पाण्याच्या गढूळपणात वाढ झाल्याने नागरिकांनी काही दिवस अतिरिक्त खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी काही काळ स्थिर ठेवून त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुरटी (Alum) फिरवून गाळ खाली बसू द्यावा. त्यानंतर वरचे स्वच्छ पाणी गाळून किंवा योग्य फिल्टरद्वारे शुद्ध करून ते उकळून पिण्यासाठी वापरावे, असे विभागाने सुचविले आहे.

याशिवाय, सिंहगड रस्त्यालगतच्या हवेली तालुक्यातील गावांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर केवळ निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जाते. त्या भागात जलशुद्धीकरण (फिल्टर) प्रकल्प उपलब्ध नसल्यामुळे संबंधित नागरिकांनी पाण्यात आवश्यकतेनुसार तुरटीचा वापर करून गढूळपणा कमी करावा आणि त्यानंतर पाणी गाळून व उकळूनच वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेने सर्व नागरिकांनी या सूचनांची नोंद घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Followers