आषाढी वारी 2026: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे पुण्यात 9 ते 12 जुलैदरम्यान आगमन; मार्ग, मुक्काम आणि सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण माहिती.

 आषाढी वारी 2026 निमित्त संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुणे शहरात 9 जुलै ते 12 जुलै 2026 या कालावधीत आगमन, मुक्काम आणि प्रस्थान होणार आहे. हा सोहळा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा असून, दरवर्षी लाखो वारकरी आणि भाविक या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुण्यात येतात.

9 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बोपखेल मार्गे पुण्यात दाखल होईल. तेथून फुलेनगर येथे दुपारचे भोजन झाल्यानंतर पालखी भवानी पेठ येथील विठोबा मंदिरात मुक्कामी पोहोचेल. या मार्गाचे एकूण अंतर सुमारे 16 किलोमीटर आहे. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांची पालखी हॅरिस ब्रिज, खडकी मार्गे पुण्यात येऊन नाना पेठ येथील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी राहील. या मार्गाचे अंतर सुमारे 12 किलोमीटर आहे.

10 जुलै रोजी दोन्ही पालख्या पुणे शहरात मुक्कामी राहतील. 11 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर, उरुळी देवाची आणि वडकीनाला मार्गे सासवडकडे प्रस्थान करेल. संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी पोहोचेल. 12 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी नायगाव फाटा मार्गे पुढील प्रवासाला रवाना होईल.

पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके, गुन्हे शाखेची स्वतंत्र टीम, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथके तसेच तात्काळ प्रतिसाद देणारी (QRT) पथके तैनात करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, चोरी,


पाकिटमारी आणि इतर अनुचित प्रकार रोखण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

यंदाही दोन्ही पालख्यांचे लाईव्ह लोकेशन नागरिकांना वेबपेज आणि सामाजिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच वाहतूक बदल, बंद रस्ते आणि पर्यायी मार्गांची माहितीही ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येईल. पालखी मार्गावर नागरिकांच्या मदतीसाठी विशेष पोलिस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.

भाविकांच्या दर्शनासाठी स्वतंत्र महिला आणि पुरुष रांगा ठेवण्यात आल्या असून, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. संपूर्ण पालखी मार्गावर सीसीटीव्ही देखरेख, एआय-सक्षम कॅमेरे, फेस रिकग्निशन प्रणाली आणि अॅडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर 125 एआय-लिंक्ड कॅमेरे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गावर 101 एआय-लिंक्ड कॅमेरे, 28 फेस रिकग्निशन कॅमेरे आणि 36 अॅडव्हान्स व्हिडिओ अॅनालिटिक्स कॅमेरे कार्यरत असतील.

पालखी सोहळा शांततेत, सुरक्षितपणे आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने आवश्यक नियोजन पूर्ण केले असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Followers