भारतातील पहिली डेंग्यू लस आता मंजूर! 💉
नवी दिल्ली : भारतात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) यांनी Qdenga® (Dengue Tetravalent Vaccine – Live, Attenuated) या डेंग्यू लसीला विपणनासाठी अधिकृत मंजुरी दिली आहे. जर्मनीतील Takeda GmbH कंपनीने ही लस विकसित केली असून भारतात तिची आयात Takeda Biopharmaceuticals India Pvt. Ltd. मार्फत केली जाणार आहे. भारतात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी मंजूर झालेली ही पहिली लस ठरली आहे.
ही मंजुरी औषधे आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 तसेच औषध नियम, 1945 यांच्या तरतुदीनुसार लसीच्या गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे सखोल वैज्ञानिक मूल्यमापन केल्यानंतर देण्यात आली आहे.
Qdenga® ही जिवंत पण दुर्बल (Live Attenuated) स्वरूपातील चारही डेंग्यू विषाणू प्रकारांपासून संरक्षण देणारी (Tetravalent) लस आहे. ही लस रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. लस Vero Cells मध्ये तयार केली जाते आणि त्यामध्ये जनुकीयदृष्ट्या सुधारित घटकांचा (Genetically Modified Organisms - GMOs) समावेश आहे. ही लस फ्रीझ-ड्राइड पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असून पुनर्गठन (Reconstitution) केल्यानंतर त्वचेखाली (Subcutaneous) इंजेक्शनद्वारे दिली जाते.
ही लस 4 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लसीकरणासाठी 0.5 मिलीचे दोन डोस देण्याची शिफारस करण्यात आली असून पहिल्या डोसनंतर तीन महिन्यांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार आहे.
या लसीच्या मंजुरीसाठी जागतिक स्तरावरील विस्तृत क्लिनिकल अभ्यासांचा आधार घेण्यात आला आहे. डेंग्यू प्रादुर्भाव असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या प्रदेशांमध्ये या लसीची सुरक्षितता, प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची क्षमता (Immunogenicity) आणि परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यात आले. ब्राझील, थायलंड आणि श्रीलंका यांसह आठपेक्षा अधिक देशांमध्ये हे अभ्यास करण्यात आले. तसेच भारतात 4 ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींवर फेज-III सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती अभ्यास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
Qdenga® या लसीला यापूर्वीच युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड यांसह 42 देशांमध्ये नियामक मान्यता मिळाली आहे. तसेच या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) प्रीक्वालिफिकेशन मान्यताही प्राप्त झाली आहे. आतापर्यंत जगभरात या लसीचे 2.4 कोटींहून अधिक डोस वितरित करण्यात आले असून वापरानंतरच्या सुरक्षा निरीक्षणामध्ये कोणतीही महत्त्वाची सुरक्षिततेची समस्या आढळलेली नाही.
भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मिळालेली मंजुरी ही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे. राष्ट्रीय व्हेक्टर जन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या डास नियंत्रण, रोगनियंत्रण, लवकर निदान आणि रुग्ण व्यवस्थापनाच्या उपाययोजनांना या लसीची महत्त्वपूर्ण साथ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच सुरक्षित, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण लसी व औषधे नागरिकांपर्यंत वेळेवर पोहोचविण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता या निर्णयातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.
