NHAI ची मोठी पायरी! राष्ट्रीय महामार्गांच्या देखभालीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यावसायिक व्यवस्थापन प्रणाली लागू


 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रायोजित नॅशनल हायवेज इन्फ्रा ट्रस्ट (NHIT) ने राष्ट्रीय महामार्गांच्या संचालन आणि देखभालीची (Operations & Maintenance - O&M) गुणवत्ता अधिक प्रभावी आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी जनरल मॅनेजमेंट कन्सल्टंट्स (GMCs) नियुक्त केले आहेत. या उपक्रमामुळे राष्ट्रीय महामार्ग मालमत्तेचे व्यवस्थापन अधिक व्यावसायिक पद्धतीने होणार असून कार्यक्षमता वाढविण्यास मदत होईल.

NHIT ची नोंदणी ऑक्टोबर 2020 मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) कडे InvIT म्हणून करण्यात आली होती. सध्या NHIT कडे एकूण 2,653 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग मालमत्तेचे व्यवस्थापन आहे. पहिल्या टप्प्यात 908 किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या संचालन व देखभालीची जबाबदारी GMCs कडे सोपविण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश मालमत्तेची कार्यक्षमता वाढविणे, संचालन अधिक परिणामकारक करणे आणि जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे हा आहे.

NHIT ला नॅशनल हायवेज InvIT प्रोजेक्ट मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड (NHIPMPL) या NHAI च्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीचे सहकार्य मिळते. प्रकल्प व्यवस्थापक म्हणून NHIPMPL राष्ट्रीय महामार्गांच्या संचालन व देखभालीची जबाबदारी पार पाडते. तसेच SEBI च्या InvIT नियमांनुसार अहवाल, प्रकटीकरण आणि प्रमाणन प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारीही तिच्यावर आहे.

नवीन व्यवस्थेनुसार GMCs दररोज, साप्ताहिक आणि मासिक अशा नियमित तपासण्या करतील. या तपासण्या प्रत्यक्ष पाहणीबरोबरच आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने केल्या जातील. तपासणीच्या आधारे देखभाल आवश्यक असलेले भाग, रस्ते सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, दोष दूरुस्ती, क्षमता वाढविण्याची कामे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुधारणा निश्चित केल्या जातील.

याशिवाय GMCs विशेष कंत्राटदार आणि विविध संस्थांच्या नियुक्तीची प्रक्रिया हाताळतील, कामांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतील, पूर्ण झालेल्या कामांचे प्रमाणन करतील तसेच टोल प्लाझा संचालन आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाय सुचवतील. SEBI च्या नियामक चौकटीचे पालन आणि वेळेवर अहवाल सादर करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे असेल.

या उपक्रमातून राष्ट्रीय महामार्गांच्या संपूर्ण जीवनचक्र व्यवस्थापनात जागतिक दर्जाच्या पद्धतींचा अवलंब करण्याच्या NHAI च्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनात विशेष कौशल्य असलेल्या व्यावसायिक O&M सल्लागारांचे स्वतंत्र परिसंस्था विकसित होईल. तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय, नवकल्पना आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.

यापुढे NHAI राष्ट्रीय महामार्गांच्या मालमत्ता व्यवस्थापनाला अधिक सक्षम करण्यासाठी विशेष संचालन व देखभाल कंत्राटदारांचे मजबूत जाळे विकसित करण्याचाही मानस ठेवत आहे. सुधारित प्रशासन, अधिक कार्यक्षम संचालन आणि SEBI नियमांचे प्रभावी पालन यामुळे देशांतर्गत तसेच जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ होऊन भारतातील राष्ट्रीय महामार्ग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Followers