मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट; लुप्त होत चाललेल्या भारतीय कलांच्या जतनावर भर
मुंबई | 16 जुलै 2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुरुवारी मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला (CSMVS) भेट देऊन तेथील ऐतिहासिक आणि कलात्मक वारशाची पाहणी केली. विविध साहित्य, तंत्र आणि शैलींमध्ये साकारलेल्या मौल्यवान कलावस्तूंचे त्यांनी निरीक्षण केले.
भेटीदरम्यान राज्यपालांनी संग्रहालयाच्या कार्याचे कौतुक करत भारतातील लुप्त होत चाललेल्या पारंपरिक कलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी संग्रहालयाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संग्रहालयाचे महासंचालक आणि विश्वस्त मंडळाचे सचिव सब्यसाची मुखर्जी यांनी राज्यपालांना संग्रहालयाचा इतिहास, स्थापनेपासून झालेली प्रगती आणि त्याच्या विकासाचा सविस्तर आढावा दिला.
यानंतर सब्यसाची मुखर्जी आणि संग्रहालयातील अन्य क्युरेटर्स यांनी राज्यपालांना संग्रहालयातील विविध दालनांची माहिती दिली. यामध्ये 'गॅलरी ऑफ इंडिया अँड द एन्शंट वर्ल्ड', शिल्पकला दालन, हिमालयीन कला दालन, तसेच लघुचित्रे आणि वस्त्रसंग्रहाचे संग्रहण विभाग यांचा समावेश होता. या दालनांमध्ये जतन करण्यात आलेल्या ऐतिहासिक आणि कलात्मक वस्तूंची राज्यपालांनी पाहणी केली.
सब्यसाची मुखर्जी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आपल्या समृद्ध वारशाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. विशेषतः शैक्षणिक कार्यक्रम, मोबाईल संग्रहालय आणि इतर जनसंपर्क उपक्रमांद्वारे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संग्रहालय करत आहे.
या भेटीदरम्यान राज्यपालांनी संग्रहालयातील ऐतिहासिक आणि कलात्मक संग्रहाचे बारकाईने निरीक्षण केले तसेच भारतीय कला आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी संग्रहालयाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. भारतीय पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी अशा संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
***
