पावसाळी अधिवेशन २०२६ च्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास,
तरुणांची क्षमता आणि संसदीय चर्चेचे महत्त्व अधोरेखित केले.
नवी दिल्ली: संसदेच्या २०२६ च्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसाळा आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन यांची तुलना करत, दोन्ही सक्रिय आणि फलदायी ठरल्यास देशाच्या विकासाला मोठी चालना मिळते, असे सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, पाऊस जसा देशाच्या कल्याणासाठी महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे संसदेचे अधिवेशनही विधायक चर्चा आणि सकारात्मक निर्णयांमुळे राष्ट्रहितासाठी उपयुक्त ठरते. "पावसाळा सक्रिय राहो आणि संसदेचे पावसाळी अधिवेशनही फलदायी ठरो," अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
गेल्या एका महिन्यात भारताने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच अंतराळ क्षेत्रात अनेक ऐतिहासिक यश मिळविल्याचे सांगताना त्यांनी देशवासीयांचा अभिमान वाढल्याचे नमूद केले. मागील अधिवेशनापूर्वी एका भारतीयाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) प्रवेश केला होता, तर आता स्कायरूट या भारतीय खासगी अंतराळ स्टार्टअपने ऐतिहासिक कामगिरी करून देशाला खासगी अंतराळ संशोधनाच्या नव्या पर्वात प्रवेश मिळवून दिला आहे, असे त्यांनी सांगितले. सरासरी २८ वर्षे वय असलेल्या तरुणांच्या या यशामुळे भारताचा जागतिक स्तरावरील सन्मान अधिक वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुणांच्या अमर्याद क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना पंतप्रधानांनी सांगितले की, सरकारने राबविलेल्या सुधारणा आणि धोरणात्मक बदलांमुळे तरुण उद्योजकांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती साकार करण्याची संधी मिळाली आहे.
