पुणे : पाणीपुरवठा प्रकल्पांची पाहणी; गढूळ पाण्याच्या तक्रारींवर अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

 

पुणे : पाणीपुरवठा प्रकल्पांची पाहणी; गढूळ पाण्याच्या तक्रारींवर अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (सामान्य) श्रीमती पवनीत कौर यांनी शहरातील विविध पाणीपुरवठा प्रकल्पांची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यासोबतच शहरातील काही भागांत गढूळ पाणीपुरवठ्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमृत 2.0 अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या 125 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. प्रकल्पाची सद्यस्थिती, कामाची प्रगती आणि पुढील टप्प्यांबाबत माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

यानंतर धायरी येथील वेंकटेश सेरेनिटी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पाणी साठवण जलाशयाची कार्यस्थिती तपासण्यात आली. या जलाशयामुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.

गढूळ तसेच संभाव्य दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बरंगणी मळा विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच सीडब्ल्यूपीआरएस (CWPRS) परिसरात प्रस्तावित नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेची पाहणी करून भविष्यातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय जुना पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्प येथे सुरू असलेल्या जलशुद्धीकरण प्रक्रियेची तपासणी करण्यात आली. या ठिकाणीही गढूळ पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

पुणे महानगरपालिका नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी पुन्हा स्पष्ट करण्यात आले. शहराची पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच सुरू असलेल्या आणि आगामी जलसुविधा प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचेही प्रशासनाने सांगितले.       

Followers