ईशान्य भारतातील नवकल्पनांना नवी चालना! गुवाहाटीत AIM SUMVAAD 2026 परिषद; विकसित भारत 2047 साठी नव्या रोडमॅपची आखणी

 

ईशान्य भारतातील नवकल्पनांना नवी चालना! 

गुवाहाटी | 15 जुलै 2026 : भारताच्या नवकल्पना (Innovation) क्षेत्रात ईशान्य भारताची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी नीती आयोगाच्या (NITI Aayog) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) तर्फे 'रीजनल AIM SUMVAAD – नॉर्थ ईस्ट चॅप्टर 2026' या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन आसाममधील गुवाहाटी येथे करण्यात आले. या परिषदेत धोरणनिर्माते, विविध राज्य सरकारांचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, शैक्षणिक संस्था, इनक्युबेटर्स आणि स्टार्टअप परिसंस्थेतील विविध भागधारक सहभागी झाले.

या परिषदेचा मुख्य उद्देश अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या आठ ईशान्य राज्यांमध्ये नवकल्पना-आधारित विकासासाठी संयुक्त आणि दीर्घकालीन रोडमॅप तयार करणे हा होता.

ईशान्य भारत हा जैवविविधता, समृद्ध सांस्कृतिक वारसा, बांबू संसाधने, पारंपरिक हस्तकला आणि वेगाने विकसित होत असलेल्या उद्योजकीय वातावरणामुळे देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रदेश मानला जात आहे. तसेच हा प्रदेश भारताचा आग्नेय आशियाकडे जाणारा प्रवेशद्वार म्हणूनही ओळखला जात असल्याने त्याचे धोरणात्मक महत्त्व अधिक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अटल इनोव्हेशन मिशनने या प्रदेशाला 'विकसित भारत @2047' या राष्ट्रीय उद्दिष्टासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा केंद्रबिंदू म्हणून अधोरेखित केले.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. जोराम अनिया, सदस्य, नीती आयोग, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत आसाम सरकारचे आयुक्त व सचिव यांनी विशेष भाषण केले. आपल्या भाषणात डॉ. अनिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताला दिलेल्या 'अष्टलक्ष्मी' या संकल्पनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, आठही राज्यांमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि प्रचंड क्षमता असून ती भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

त्यांनी पुढे सांगितले की, नीती आयोगाने आठही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सातत्याने संवाद साधत पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था आणि आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. 'Act East to Act Fast' या दृष्टिकोनामुळे ईशान्य भारत आज देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी आला असून भविष्यात नवकल्पना, उद्योजकता आणि शाश्वत विकासाचे जागतिक केंद्र बनण्याची क्षमता त्याच्यात आहे.

अटल इनोव्हेशन मिशनचे वित्त प्रमुख सुमित गाखर यांनी स्वागतपर भाषणात राज्य सरकारे, इनोव्हेशन संस्था, इनक्युबेटर्स आणि विविध भागधारकांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी AIM कटिबद्ध असल्याचे सांगितले.

अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन संचालक दीपक बागला यांनी सांगितले की, ईशान्य भारतातील प्रतिभा, सांस्कृतिक समृद्धी, नैसर्गिक संसाधने आणि उद्योजकीय क्षमता विकसित भारताच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतील. स्थानिक सामर्थ्यावर आधारित नवकल्पना आणि 'सबका प्रयास' या तत्त्वाच्या माध्यमातून या प्रदेशातील तरुण उद्योजकांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम करण्याचे AIM चे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या परिषदेत आठही ईशान्य राज्यांच्या राज्य परिषदांचे प्रतिनिधी, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (DST), जैवतंत्रज्ञान विभाग (DBT), अटल इनक्युबेशन सेंटर्स (AICs) आणि अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स (ACICs) यांनी "प्रदेशातील नवकल्पना परिसंस्थेतील भागधारकांना एकत्रित करणे" या विषयावर गोलमेज चर्चेत सहभाग घेतला. या चर्चेत राष्ट्रीय उपक्रम आणि प्रादेशिक गरजा यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.

दिवसभर चाललेल्या या परिषदेत बांबू आणि जैवसंसाधनांवर आधारित उद्योग, तंत्रज्ञानाधारित शाश्वत पर्यटन, तसेच पारंपरिक हातमाग व हस्तकला क्षेत्रातील नवकल्पनांद्वारे स्थानिक रोजगारनिर्मिती या विषयांवर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी आयोजित विशेष चर्चासत्रात आयआयटी गुवाहाटी, मायरियडएआय, एसएनएल एनर्जी सोल्यूशन्स आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या प्रतिनिधींनी स्टार्टअप्सना कल्पनेपासून उद्योग उभारणीपर्यंत सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या इनक्युबेशन यंत्रणेवर चर्चा केली.

याशिवाय, स्टार्टअप्सना वित्तपुरवठा, उद्योग क्षेत्राशी भागीदारी आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर एचडीएफसी बँक, न्यूमालिगढ रिफायनरी, NEDFi आणि टाटा फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली.

परिषदेच्या समारोप सत्रात स्थानिक विकासासाठी सक्षम आणि टिकाऊ नवकल्पना परिसंस्था उभारण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यक्रम संचालक प्रतीक देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

उत्तर, दक्षिण, मध्य आणि पूर्व भारतातील यशस्वी परिषदांनंतर आयोजित करण्यात आलेले रीजनल AIM SUMVAAD – नॉर्थ ईस्ट चॅप्टर 2026 हे SUMVAAD मालिकेतील अत्यंत महत्त्वाचे पर्व ठरले. धोरणनिर्माते, राज्य सरकारे, उद्योग, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था, इनक्युबेटर्स आणि उद्योजक यांना एकत्र आणून अटल इनोव्हेशन मिशनने देशाच्या प्रत्येक भागात सर्वसमावेशक नवकल्पना परिसंस्था उभारण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.




 

Followers