भारताची पहिली हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन सज्ज! 2,600 प्रवाशांची क्षमता, धूर नाही, प्रदूषण नाही; रेल्वेच्या हरित युगाची नवी सुरुवात
भारताची पहिली हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन सज्ज!
भारताची पहिली हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी प्रवासी रेल्वे लवकरच सेवेत दाखल होणार असून, भारतीय रेल्वेच्या हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ही ट्रेन स्वतःच हायड्रोजनच्या साहाय्याने वीज निर्माण करून चालते. त्यामुळे वापराच्या ठिकाणी जवळपास शून्य प्रदूषण होते आणि उपउत्पादन म्हणून केवळ पाण्याची वाफ तयार होते.
गेल्या 12 वर्षांत भारतीय रेल्वेने ब्रॉडगेज मार्गांचे 99 टक्क्यांहून अधिक विद्युतीकरण पूर्ण केले आहे. आता त्यानंतरच्या टप्प्यात स्वच्छ ऊर्जा वापरणाऱ्या हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. पारंपरिक विद्युत रेल्व्यांप्रमाणे ओव्हरहेड वायरमधून वीज घेण्याऐवजी ही ट्रेन हायड्रोजन आणि वातावरणातील ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेतून स्वतःच वीज तयार करते.
ही ट्रेन जिंद–सोनीपत मार्गावर सुरुवातीला धावणार असून तिचा कार्यरत वेग 75 किमी प्रतितास आणि कमाल डिझाइन वेग 110 किमी प्रतितास आहे. सुमारे 89 किलोमीटरच्या या मार्गावर ही सेवा सुरू केली जाणार आहे.
जगातील बहुतांश हायड्रोजन प्रवासी गाड्या दोन ते चार डब्यांच्या असून त्या प्रामुख्याने छोट्या प्रादेशिक मार्गांवर धावतात. मात्र भारतीय रेल्वेची ही ट्रेन 10 डब्यांची असून सुमारे 2,600 प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता तिच्यात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतुकीसाठी हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
हायड्रोजन ट्रेन कशी कार्य करते?
या ट्रेनमध्ये प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन (PEM) फ्युएल सेल बसविण्यात आला आहे. ट्रेनमध्ये साठवलेला हायड्रोजन आणि वातावरणातील ऑक्सिजन यांच्या अभिक्रियेतून वीज तयार होते. ही वीज ट्रॅक्शन मोटर्सना पुरवली जाते आणि त्याद्वारे ट्रेन धावते. या प्रक्रियेत धूर किंवा कार्बन उत्सर्जन होत नाही. उपउत्पादन म्हणून केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता निर्माण होते.
या ट्रेनमध्ये दोन हायड्रोजन ड्रायव्हिंग पॉवर कार (DPC) आणि आठ ट्रेलर कोच आहेत. प्रत्येक पॉवर कारमध्ये फ्युएल सेल, लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी आणि हायड्रोजन साठवणूक सिलिंडर बसविण्यात आले आहेत. प्रत्येक पॉवर कार 1,200 किलोवॅट (सुमारे 1,600 अश्वशक्ती) इतकी शक्ती निर्माण करते.
जिंद येथे देशातील सर्वात मोठे हायड्रोजन रिफ्युएलिंग केंद्र
या ट्रेनसाठी हरियाणातील जिंद येथे भारतीय रेल्वेने देशातील सर्वात मोठे रेल्वे हायड्रोजन रिफ्युएलिंग केंद्र उभारले आहे.
या केंद्रात प्रथम इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे पाण्यापासून हायड्रोजन तयार केला जातो. त्यानंतर हा हायड्रोजन 500 बार दाबाने संकुचित करून सुरक्षितपणे साठवला जातो. ट्रेनमध्ये इंधन भरण्यासाठी 350 बार दाबाने दोन स्वतंत्र डिस्पेंसरद्वारे एकाच वेळी दोन्ही पॉवर कारमध्ये हायड्रोजन भरला जातो. या केंद्रात एकावेळी सुमारे 3,000 किलो हायड्रोजन साठवण्याची क्षमता असून या सुविधेला पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) ची मान्यता मिळाली आहे.
सुरक्षिततेसाठी बहुपदरी व्यवस्था
हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील असल्याने भारतीय रेल्वेने या प्रकल्पात बहुपदरी सुरक्षा प्रणाली विकसित केली आहे. ट्रेन आणि रिफ्युएलिंग केंद्रामध्ये हायड्रोजन गळती, तापमानातील वाढ, आग आणि धूर ओळखण्यासाठी अत्याधुनिक सेन्सर बसविण्यात आले आहेत.
कोठेही गळती आढळल्यास स्वयंचलित प्रणाली तात्काळ हायड्रोजनचा पुरवठा बंद करते. सतत कार्यरत वायुवीजन प्रणालीमुळे गळती झाल्यास हायड्रोजन वातावरणात सुरक्षितपणे विरळ होतो.
लोको पायलटच्या सुरक्षेलाही विशेष महत्त्व देण्यात आले असून त्याच्या केबिनमध्ये संपूर्ण प्रणालीची स्थिती दाखवणारी मॉनिटरिंग व्यवस्था उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी विशेष मोडची सुविधाही देण्यात आली आहे.
जिंद येथील हायड्रोजन प्रकल्पातही गळती शोध यंत्रणा, फ्लेम डिटेक्टर, स्वयंचलित शटडाऊन प्रणाली, अग्निशमनासाठी वॉटर स्प्रे आणि फायर अलार्म यांसारख्या सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत.
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणित
संपूर्ण हायड्रोजन प्रणाली NFPA-2 आणि ISO 19880 मालिकेतील आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यात आली आहे. तसेच पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) च्या नियमांचे पालन करण्यात आले आहे.
सेवा सुरू करण्यापूर्वी जर्मनीतील TÜV SÜD या स्वतंत्र तांत्रिक तपासणी आणि प्रमाणन संस्थेकडून संपूर्ण प्रकल्पाची सुरक्षा तपासणी करण्यात आली.
विविध कठोर चाचण्या यशस्वी
प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वी या ट्रेनची लोड बॉक्स चाचणी, रेडिओ फ्रिक्वेन्सी चाचणी, ऑसिलेशन चाचणी तसेच आपत्कालीन ब्रेकिंग अंतराची चाचणी करण्यात आली. या सर्व चाचण्या, कायदेशीर तपासण्या आणि स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच ट्रेनला संचालनासाठी मंजुरी देण्यात आली.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर
ही ट्रेन पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आली आहे. रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) ने तांत्रिक मानके निश्चित करून डिझाइन मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली. ट्रेनचे एकत्रीकरण मेडहा सर्वो ड्राइव्ह्सने केले असून इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ने ट्रेनची थीम आणि बाह्य रचना विकसित केली आहे.
जगात भारताची वेगळी ओळख
जर्मनीने सर्वप्रथम व्यावसायिक हायड्रोजन प्रवासी रेल्वे सुरू केली होती. फ्रान्स, इटली, चीन, जपान आणि इतर काही देशांमध्येही मर्यादित स्वरूपात अशा गाड्यांचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र त्या प्रामुख्याने दोन ते चार डब्यांच्या आहेत.
भारतीय रेल्वेची 10 डब्यांची, सुमारे 2,600 प्रवाशांची क्षमता असलेली हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन आणि जिंद येथील संपूर्ण हायड्रोजन परिसंस्था या दोन्ही बाबींमुळे भारताने या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
पुढील दिशा
जिंद–सोनीपत प्रकल्पातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे भारतीय रेल्वे कालका–शिमला यांसारख्या हेरिटेज रेल्वे मार्गांवरही हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासत आहे.
या उपक्रमांमुळे भारतीय रेल्वे हरित, शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत असून, राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन आणि भारताच्या नेट झिरो उद्दिष्टाला बळकटी मिळणार आहे.





