पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी भक्ती शक्ती चौक येथे जागतिक बँक मुख्य जलवाहिनीच्या स्थलांतराचे काम करण्यात येणार आहे. तसेच होळकर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक दुरुस्ती आणि देखभाल कामे गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी नियोजित करण्यात आली आहेत. या कामांमुळे संबंधित भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, 24 जुलै 2026 रोजी संबंधित परिसरात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बंडगार्डन पाणीपुरवठा विभागांतर्गत मराठे वस्ती, गणेशनगर (बोपखेल), कळस माळवाडी, जाधववस्ती, विश्रांतवाडी परिसर, संजय पार्क, वर्षाशील, विमानतळ परिसर, रमेशवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, अहिल्यानगर, स्व. मैनिक नगर, हरिगंगा सोसायटी, सायप्रस, समाज कल्याण वसतिगृह, विश्वशांतीवाडी, पोलीस लाईन, आरोग्य भवन, शांतीनगर, भारतनगर, कात्रजवाडी, प्रतीकनगर, जेडीसी पार्क, वृंदावन सोसायटी, उत्तम टाउनशिप, मित्तल सोसायटी, ड्रीम सोसायटी, जाधव नगर, पंचशील नगर, श्रमिक नगर, कामगार नगर आणि चंद्रमा नगर या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
याशिवाय चतुःशृंगी पाणीपुरवठा विभागांतर्गत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर, अॅम्युनिशन फॅक्टरी खडकी, मुळा रोड परिसर आणि भोसरी वस्ती या भागांनाही या पाणीबंदचा परिणाम जाणवणार आहे.
पुणे महानगरपालिकेने नागरिकांना नियोजित पाणीबंदची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याची विनंती केली आहे. आवश्यक दुरुस्ती आणि जलवाहिनी स्थलांतराची कामे पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
