कारगिल विजय दिवस 2026: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'शौर्य विजय यात्रा'ला हिरवा झेंडा; 28 रायडर्स 1,900 किमी प्रवासातून शहीद वीरांना वाहणार अभिवादन
नवी दिल्ली | 14 जुलै 2026: कारगिल विजय दिवस 2026 च्या देशव्यापी स्मरणोत्सवाचा एक भाग म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 14 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकातून (National War Memorial) द्रास, लडाख येथील कारगिल युद्ध स्मारकापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या 13 दिवसांच्या 'शौर्य विजय यात्रा' या मोटारसायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
या मोहिमेत सेवेत असलेले आणि निवृत्त संरक्षण दलातील जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह एकूण 28 रायडर्स सहभागी झाले आहेत. हे रायडर्स उत्तरेकडील हिमालयातील कठीण मार्गावरून 1,900 किलोमीटरचा प्रवास करत 1999 च्या कारगिल युद्धात शौर्य, धैर्य आणि सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय वीरांना अभिवादन करणार आहेत. या मोहिमेचे ब्रीदवाक्य "One Ride, One Nation, One Salute" असे आहे.
यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला आदरांजली वाहिली. त्यांनी सांगितले की, भारतीय जवानांनी धैर्य, संयम, शिस्त आणि अद्वितीय देशभक्तीचे असे सुवर्णपान इतिहासात लिहिले आहे, ज्याचा आजही जगभरातील सैन्यदलांकडून अभ्यास केला जातो आणि सन्मानाने उल्लेख केला जातो.
ते म्हणाले की, जवळपास 20 हजार फूट उंचीवर आणि उणे 40 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय सैनिकांनी अतुलनीय धैर्य आणि जिद्दीच्या बळावर आपले उद्दिष्ट साध्य केले. त्यांनी शत्रूच्या ताब्यातील प्रत्येक शिखर, टेकडी आणि बंकर पुन्हा जिंकून तिरंग्याचा मान कायम राखला. 1999 मधील कारगिल विजय हा भारताच्या भूमी, अस्मिता आणि सन्मानावर वाईट नजरेने पाहणाऱ्यांना ठाम आणि समर्थ प्रत्युत्तर देण्याच्या देशाच्या अढळ निर्धाराचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संरक्षणमंत्र्यांनी कारगिल युद्धातील शौर्याबद्दल परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुबेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंह यादव (निवृत्त) आणि सुबेदार मेजर (मानद कॅप्टन) संजय कुमार (निवृत्त) यांच्यासह सर्व भारतीय वीरांचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, या शूर सैनिकांचे जीवन देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी असून भविष्यातील पिढ्यांनाही ते प्रेरणा देत राहतील.
या यात्रेदरम्यान रायडर्स चंदीमंदिर युद्ध स्मारक, रेझांग ला युद्ध स्मारक आणि लेह युद्ध स्मारक येथे जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. तसेच ते वीर नारींशी संवाद साधून त्यांच्या धैर्य आणि जिद्दीचा गौरव करतील.
ही मोहीम 26 जुलै 2026, कारगिल विजय दिनाच्या दिवशी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकात समाप्त होणार आहे.
या यात्रेतील एक विशेष उपक्रम म्हणून रायडर्स राष्ट्रीय युद्ध स्मारकातील पवित्र मातीचे कलश सोबत घेऊन जाणार आहेत. कारगिल येथे ही माती अर्पण करून शहीद वीरांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. याबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, राष्ट्रीय युद्ध स्मारकातील माती कारगिलच्या भूमीत मिसळणे म्हणजे आजच्या पिढीचा आदर आणि राष्ट्राच्या वीरांच्या पराक्रमाचा पवित्र संगम असेल.
शौर्य विजय यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मोहिमेत सेवेत असलेले अधिकारी, माजी सैनिक आणि देशाच्या विविध भागांतील नागरिक एकत्र सहभागी झाले आहेत. भाषा, परंपरा आणि पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी एक तिरंगा, एक राष्ट्र आणि आपल्या वीरांप्रती समान आदर हीच भारताची खरी ओळख असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
या ध्वजप्रदान सोहळ्यास राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC) चे कॅडेट्सही उपस्थित होते. ही यात्रा विशेषतः तरुणांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करेल, तसेच राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे संरक्षण केवळ सीमांवरच नव्हे, तर आपल्या स्मृती आणि मूल्यांमधूनही केले जाते, हा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवेल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.
VK/NA/Savvy
या कार्यक्रमाला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन. एस. राजा सुब्रमणी, लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ऑपरेशन विजय दरम्यान भारतीय सैन्याने जपलेल्या कर्तव्य, सन्मान आणि निःस्वार्थ सेवेच्या मूल्यांचा वारसा पुढे नेण्याच्या भारतीय सैन्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून शौर्य विजय यात्रा आयोजित करण्यात आली आहे.




