जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त वडगाव शेरीत शिवसेनेच्यावतीने गुटखा व सिगारेटची होळी...






पुणे (प्रतिनिधी) –

31 मे 2025 रोजी वडगाव शेरीत शिवसेनेच्यावतीने तंबाखू, गुटखा, सिगारेटविरोधात होळी करत जनजागृती – जागतिक तंबाखू निषेध दिन.

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने वडगाव शेरीतील चंदननगर भाजी मंडईजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर गुटखा, सिगारेट, तंबाखू आणि इतर व्यसनी पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. या उपक्रमात डॉ. कल्याणजी गंगवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जनजागृती कार्यक्रम पार पडला.

या वेळी पुणे महानगर शिवसेना प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर, तसेच शिवसेनेचे हेमंत बत्ते यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “आज भारतात तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या गर्तेत अडकत आहे. सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तंबाखू, गुटखा, गांजा, अमली पदार्थ यांचे उत्पादन करणाऱ्या मोठ्या कारखानदारांवर कठोर कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे. केवळ छोट्या विक्रेत्यांवर कारवाई न करता उत्पादनाच्या मुळावर घाव घातला पाहिजे.”

त्यांनी पुढे सांगितले, “धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना अनेक गंभीर आजार होतात. आज अनेक राजकीय नेते देखील या व्यसनांमुळे त्रस्त आहेत. धुम्रपानाच्या वनस्पतीचा पाला जनावरंही खात नाहीत, मग माणूस का खातो यावर विचार झाला पाहिजे.”

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावेळी सांगितले की, “शिवसेना नेहमीच अशा सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत आली आहे. पुण्यातील विविध भागांत आम्ही तंबाखू, गुटखाविरोधात जनजागृती मोहीम राबवणार असून, अशा उत्पादन करणाऱ्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाईल.”

कार्यक्रमाचे आयोजन करणारे हेमंत बत्ते यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत सांगितले की, “वडगाव शेरी परिसरात अशा प्रकारची जनजागृती मोहीम सातत्याने राबवली जाणार आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी "व्यसन करणार नाही" अशी शपथ घेत धुम्रपानजन्य पदार्थांची होळी करून निषेध व्यक्त केला.

या वेळी राजाभाऊ चौधरी, शंकर संगम, उद्धव गलांडे, विनोद करतात, उदय खांडके, मनोज अष्टेकर, रमेश साळुंखे, श्याम ताठे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Followers