देवस्थानांवरील QR कोड्समुळे महाराष्ट्र ATS सतर्क.


राज्यातील धार्मिक स्थळांवर अज्ञात QR कोड्स लावल्याचे प्रकार समोर आल्याने महाराष्ट्र ATS (दहशतवादविरोधी पथक) सतर्क झाले आहे. नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबईसह काही प्रमुख मंदिरांमध्ये या QR कोड्सद्वारे निधी गोळा करण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या कोड्स मागील बँक खात्यांची चौकशी करत असताना काही ट्रान्झॅक्शन्स संशयास्पद वाटल्याने कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या QR कोड्सचा उपयोग भक्तांकडून देणग्या जमा करण्यासाठी होत असल्याचे भासवले जात होते. मात्र, या रकमा वैध संस्थांकडे न जाता अनधिकृत खात्यांमध्ये वळविल्या जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही ठिकाणी या QR कोड्स मंदिर प्रशासनाच्या नकळत लावण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात फसवणूक आणि सायबर क्राईमच्या शक्यताही तपासल्या जात आहेत.

ATS अधिकारी तांत्रिक विश्लेषण आणि आर्थिक चौकशी करत असून, सध्या काही संदिग्ध व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंदिर प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी QR कोड लावण्यासंबंधी नियमावली तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

राज्य सरकारनेही याबाबत गंभीर दखल घेतली असून, QR कोड स्कॅन करून देणगी देताना नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे..

Followers