SYNCHN 2026: BRIC-THSTI च्या उद्योग परिषदेत आरोग्य नवकल्पना आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याला नवी चालना

 


फरीदाबाद | 15 जुलै 2026: जैवतंत्रज्ञान संशोधन आणि नवोपक्रम परिषद (BRIC) अंतर्गत कार्यरत ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI) ने आज फरीदाबाद येथील NCR बायोटेक सायन्स क्लस्टर कॅम्पसमध्ये तिसरी वार्षिक उद्योग परिषद 'SYNCHN 2026 (Synergistic Collaboration in Healthcare Innovation)' यशस्वीरित्या आयोजित केली.

या परिषदेत जागतिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, जैवतंत्रज्ञान संशोधक, व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदार, स्टार्टअप्स आणि धोरणकर्ते सहभागी झाले. प्रयोगशाळेतील संशोधनाचे व्यावसायिक स्तरावरील रुग्णोपयोगी उपायांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली समन्वय व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला.

परिषदेच्या प्रमुख पाहुण्या बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. किरण मजूमदार-शॉ यांनी ऑनलाइन माध्यमातून संबोधित करताना सांगितले की, 21 वे शतक हे जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार आहे. भारतात उत्कृष्ट वैज्ञानिक संस्था असूनही संशोधनाचे प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करणे हे अजूनही मोठे आव्हान आहे. THSTI आणि SYNCHN सारखे उपक्रम संशोधनापासून व्यावसायिकीकरणापर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

THSTI चे कार्यकारी संचालक प्रा. गणेशन कार्तिकेयन यांनी प्रतिनिधींचे स्वागत करताना SYNCHN परिषदेची प्रगती अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, 2024 मधील पहिल्या परिषदेत 13 'लेटर ऑफ इंटेंट'वर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, तर 2025 मधील दुसऱ्या परिषदेत 19 बंधनकारक धोरणात्मक करार करण्यात आले.

प्रा. कार्तिकेयन यांनी संशोधनाच्या परिणामकारकतेवर भर देत THSTI च्या अत्याधुनिक सुविधा आणि संशोधन क्षमतेच्या माध्यमातून व्यावसायिकीकरणातील जोखीम कमी करण्यासाठी तसेच उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सातत्यपूर्ण संवादाला चालना देण्याची भूमिका स्पष्ट केली.

त्यांनी THSTI च्या पूर्णपणे कार्यरत मेडिकल रिसर्च सेंटर (MRC) आणि Accelerated Productisation and Epidemic Preparedness (APEX) उपक्रमाची माहिती दिली. MRC मध्ये प्रारंभिक टप्प्यातील क्लिनिकल चाचणी युनिट, प्रगत CAR-T सेल संशोधन केंद्र आणि भारतातील पहिले Controlled Human Infection Studies (CHIS) केंद्र कार्यरत आहे. APEX उपक्रमाद्वारे संशोधनातील यशस्वी संकल्पना उत्पादनक्षम जैविक औषधांमध्ये रूपांतरित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील पायलट उत्पादन सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

परिषदेदरम्यान राष्ट्रीय आरोग्य प्रशासनाशी संबंधित महत्त्वपूर्ण घडामोडींचीही माहिती देण्यात आली. औषध महानियंत्रक (DCGI) डॉ. राजीव सिंह रघुवंशी यांनी सांगितले की, CDSCO जैविक औषधांसाठी नव्या नियामक प्रणालीची निर्मिती करत असून त्यात सरकारी यंत्रणेबरोबरच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचाही सहभाग असेल.

त्याचवेळी नीती आयोगाचे सदस्य प्रा. एम. श्रीनिवास यांनी वैज्ञानिक संशोधनाचे परवडणाऱ्या, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आणि प्रत्यक्ष वापरातील आरोग्य उपायांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रमुख रुग्णालये आणि संशोधन संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली.

डीप-टेक वित्तीय क्षेत्राविषयी बोलताना डॉ. मनीष दिवाण यांनी नव्याने सुरू झालेल्या BIRAC Research Development and Innovation (RDI) Fund चा उल्लेख केला. हा निधी स्टार्टअप्स, उद्योग आणि राष्ट्रीय प्रयोगशाळांसाठी संशोधन ते उत्पादन या प्रवासातील आर्थिक तफावत भरून काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.

 इंडियन व्हेंचर अँड अल्टरनेट कॅपिटल असोसिएशन (IVCA) चे अमित पांडे यांनी भारताची जैवअर्थव्यवस्था दरवर्षी सुमारे 18 टक्के दराने वाढत असल्याचे सांगितले.

परिषदेदरम्यान विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.

'Global Health – Science, Manufacturing & Partnerships' या मुख्य सत्रात जागतिक आरोग्य क्षेत्रातील भारताची वाढती भूमिका, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्य, स्पर्धात्मक उत्पादन क्षमता, नियामक व्यवस्था, सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि मजबूत संशोधन परिसंस्थेवर चर्चा झाली.

'Accelerating Early Clinical Translation – From Discovery to First-in-Human' या सत्रात संशोधनातील महत्त्वपूर्ण निष्कर्षांचे प्रारंभिक मानवी क्लिनिकल चाचण्यांमध्ये जलद रूपांतर करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि एकात्मिक क्लिनिकल संशोधन मंचांच्या भूमिकेवर भर देण्यात आला.

'Building the Bridge – Enhancing the Efficiency of Translational Platforms' या चर्चासत्रात संशोधक, गुंतवणूकदार आणि प्रवेगक (Accelerators) यांच्यातील समन्वय वाढवून जैवतंत्रज्ञान स्टार्टअप्सना व्यावसायिक स्तरावर पोहोचविण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

परिषदेच्या शेवटी उद्योग प्रतिनिधी आणि THSTI च्या वैज्ञानिकांमध्ये मुक्त संवादाचे सत्र आयोजित करण्यात आले. तसेच सहभागी प्रतिनिधींना संस्थेतील अत्याधुनिक संशोधन सुविधा आणि मूलभूत पायाभूत संरचनेची पाहणी करण्याची संधीही देण्यात आली.


Followers