INS Mahendragiri भारतीय नौदलात दाखल; 75% स्वदेशी तंत्रज्ञानासह अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेटचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत कमिशनिंग
भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यात (ईस्टर्न फ्लीट) स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट INS महेंद्रगिरीचा शनिवारी (11 जुलै 2026) विशाखापट्टणम येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत औपचारिक समावेश करण्यात आला.
या प्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, INS महेंद्रगिरी ही भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेचे, उत्कृष्ट डिझाइन, उत्पादन कौशल्य आणि नौदलाशी संबंधित औद्योगिक परिसंस्थेच्या वेगवान विकासाचे प्रतीक आहे. अत्याधुनिक युद्धनौका वेळेत तयार करण्याची भारताची क्षमता या जहाजातून स्पष्टपणे दिसून येते.
INS महेंद्रगिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतीय नौदलात दाखल झालेली सहावी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट आहे. गेल्या दीड वर्षांत या मालिकेतील सहा युद्धनौकांचा समावेश करण्यात आला आहे. जानेवारी 2025 मध्ये INS निलगिरी, त्यानंतर ऑगस्टमध्ये INS उदयगिरी आणि INS हिमगिरी, एप्रिल 2026 मध्ये INS तारागिरी आणि गेल्या महिन्यात INS दुनागिरी नौदलात दाखल झाली होती.
ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या Warship Design Bureau ने डिझाइन केली असून मुंबईतील Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ने तिची निर्मिती केली आहे. ही फ्रिगेट ताफ्याचे हवाई संरक्षण, समुद्रावरील लक्ष्यांवर कारवाई, पाणबुडीविरोधी मोहिमा, सागरी निगराणी, समुद्री प्रतिबंधक कारवाया तसेच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) यांसारख्या विविध मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे.
सुमारे 6,670 टन विस्थापन क्षमता असलेल्या या युद्धनौकेत 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही नौका ताशी 28 नॉट्स वेगाने प्रवास करू शकते. यात सुपरसॉनिक पृष्ठभाग-ते-पृष्ठभाग क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची पृष्ठभाग-ते-आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, पाणबुडीविरोधी क्षमता, बहुउद्देशीय हेलिकॉप्टर, आधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान, अत्याधुनिक सेन्सर्स, नेटवर्क-केंद्रित युद्ध प्रणाली आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, INS महेंद्रगिरीवर जगातील सर्वात वेगवान आणि प्रभावी क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करता येते. याशिवाय मल्टीफंक्शन रडार, लांब पल्ल्यावरील हवाई धोके ओळखून निष्प्रभ करणारी पृष्ठभाग-ते-आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, स्वदेशी रॉकेट लाँचर, टॉर्पेडो लाँचर, एकात्मिक पाणबुडीविरोधी संरक्षण प्रणाली, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली आणि क्लोज-इन वेपन सिस्टम यामुळे ही युद्धनौका अधिक सक्षम आणि प्रभावी ठरते.
त्यांनी विश्वास व्यक्त केला की ही "ब्लू-वॉटर" युद्धनौका भारताच्या किनारपट्टीपुरतीच नव्हे तर दूरवरच्या महासागरांमध्येही देशाच्या सागरी हितांचे प्रभावी संरक्षण करेल.
संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर युद्ध, अंतराळ तंत्रज्ञान, हायपरसॉनिक शस्त्रे आणि मानवरहित प्रणाली यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्धाचे स्वरूप बदलले असले तरी पारंपरिक लष्करी क्षमता आजही राष्ट्रीय सुरक्षेचा मजबूत पाया आहे. आधुनिक आणि पारंपरिक क्षमता या एकमेकांच्या पूरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुढील पिढीच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करत असतानाच पारंपरिक संरक्षण क्षमताही अधिक बळकट करत आहे. ऑपरेशन सिंदूर हे आधुनिक आणि पारंपरिक लष्करी क्षमतांच्या प्रभावी समन्वयाचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. INS महेंद्रगिरी ही तंत्रज्ञानसज्ज आणि युद्धासाठी सज्ज नौदल उभारण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांनी समुद्री सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा या एकमेकांशी निगडित असल्याचे सांगितले. व्यापार, पुरवठा साखळी, ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक विकासासाठी समुद्रांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी SAGAR (Security and Growth for All in the Region) या भारताच्या दृष्टीकोनाचा पुनरुच्चार केला.
भारतीय नौदल हे इंडो-पॅसिफिक प्रदेशात विश्वासार्ह सुरक्षा भागीदार आणि 'नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर' म्हणून कार्यरत असल्याचे सांगताना त्यांनी आपत्ती निवारण, चाचेगिरीविरोधी मोहिमा तसेच संकटग्रस्त भागातून भारतीय आणि परदेशी नागरिकांच्या सुटकेतील नौदलाच्या भूमिकेचे कौतुक केले.
पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा अंतर्गत भारतीय नौदलाने 9,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा अत्यावश्यक माल वाहून नेणाऱ्या 18 व्यापारी जहाजांना सुरक्षित संरक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यामुळे भारतीय नौदल हे केवळ युद्धदल नसून देशाच्या आर्थिक हितांचे रक्षण करणारे महत्त्वाचे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, स्वदेशी युद्धनौका निर्मितीमुळे केवळ संरक्षण क्षमता वाढत नाही, तर जहाजबांधणी, पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स, प्रणोदन प्रणाली, सॉफ्टवेअर, प्रिसिजन इंजिनिअरिंग आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांनाही चालना मिळते. यामुळे रोजगारनिर्मिती, नवकल्पना आणि आर्थिक विकासालाही गती मिळते.
भारताला जागतिक जहाजबांधणी आणि सागरी संरक्षण क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र बनविण्यासाठी Maritime India Vision 2030, Maritime Development Fund, Shipbuilding Financial Assistance Scheme आणि Shipbuilding Development Scheme यांसारख्या विविध उपक्रमांवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील तरुण उद्योजक, अभियंते, संशोधक, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदारांनी भविष्यातील संरक्षण तंत्रज्ञान विकसित करून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी INS महेंद्रगिरीला भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. प्रोजेक्ट 17A अंतर्गत सहाव्या फ्रिगेटच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची कार्यक्षमता अधिक मजबूत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की, या प्रकल्पात 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून MDL आणि भारतीय नौदलाने अनेक नवे विक्रमही प्रस्थापित केले आहेत. जहाजाच्या जलावतरणापासून वितरणापर्यंतचा कालावधी 63 महिन्यांवरून 31 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच एकूण बांधकामाचा कालावधी 95 महिन्यांवरून 75 महिन्यांपर्यंत कमी झाला आहे. याशिवाय साधारणपणे पाच ते सात समुद्री चाचण्यांऐवजी सर्व तांत्रिक चाचण्या एका समुद्री चाचणीत पूर्ण करण्यात आल्या.
कमिशनिंग समारंभात नौदलाचा कमिशनिंग पेनंट फडकावण्यात आला तसेच युद्धनौकेवर प्रथमच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या कार्यक्रमाला पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल संजय भल्ला, MDL चे CMD कॅप्टन जगमोहन (निवृत्त), वरिष्ठ नौदल अधिकारी, माजी सैनिक, जहाजबांधणी उद्योगातील प्रतिनिधी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
INS महेंद्रगिरीची वैशिष्ट्ये
पूर्व घाटातील महेंद्रगिरी पर्वतरांगेच्या नावावरून या युद्धनौकेला INS महेंद्रगिरी हे नाव देण्यात आले आहे. तिचे ब्रीदवाक्य "Mighty, Majestic, Matchless" असे आहे. 200 हून अधिक भारतीय उद्योग आणि अनेक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (MSME) सहभागातून ही युद्धनौका तयार करण्यात आली आहे.
या फ्रिगेटमध्ये अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान, Combined Diesel or Gas (CODOG) प्रणोदन प्रणाली, Integrated Platform Management System आणि स्वदेशी युद्ध प्रणालींचा समावेश आहे.पूर्व ताफ्यात दाखल झाल्यानंतर INS महेंद्रगिरीमुळे भारतीय नौदलाची हिंद महासागर क्षेत्रातील सागरी संरक्षण क्षमता आणि कार्यक्षेत्र आणखी मजबूत होणार असून, MAHASAGAR या दृष्टीकोनानुसार भविष्यकालीन सक्षम नौदल उभारण्याच्या भारताच्या उद्दिष्टाला अधिक बळ मिळणार आहे.
VK/VM/Savvy






