Skip to main content
IMD ची नवी प्रगत हवामान अंदाज प्रणाली सुरू; 10 दिवस आधी स्थानिक पातळीवरील पावसाचा अचूक अंदाज
भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील हवामान अंदाज अधिक अचूक आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी दोन अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते या प्रणालींचे उद्घाटन करण्यात आले.
या नव्या प्रणालींमध्ये देशातील विविध भागांमध्ये मान्सूनच्या आगमनाचा प्रगत अंदाज तसेच उत्तर प्रदेशसाठी 1 किलोमीटर रिझोल्यूशनमध्ये 10 दिवसांपर्यंतचा पावसाचा अंदाज देणारी पायलट सेवा समाविष्ट आहे. या प्रणाली भारतीय हवामान विभाग (IMD), पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान अंदाज केंद्र (NCMRWF) यांनी संयुक्तपणे विकसित केल्या आहेत.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेल्या दशकात भारताच्या हवामान अंदाज प्रणालीत मोठे तांत्रिक बदल झाले असून आधुनिक तंत्रज्ञान, डेटा एकत्रीकरण आणि प्रगत संगणकीय मॉडेल्समुळे हवामान अंदाजाची अचूकता लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे आज IMD ही संस्था शासन, आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि दैनंदिन निर्णय प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
मान्सून आगमनाचा नवा अंदाज दर बुधवारी चार आठवडे आधी उपलब्ध होणार आहे. या सेवेचा लाभ 16 राज्यांतील 3,000 हून अधिक उपजिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे पेरणी, सिंचन, पीक संरक्षण आणि काढणी यांसारखे कृषी निर्णय अधिक अचूकपणे घेणे शक्य होईल.
उत्तर प्रदेशसाठी सुरू करण्यात आलेली पावसाच्या अंदाजाची पायलट सेवा 1 किलोमीटर क्षेत्रीय रिझोल्यूशनमध्ये 10 दिवसांपर्यंतचा अंदाज देणार आहे. या प्रणालीमध्ये स्वयंचलित पर्जन्यमापक, हवामान केंद्रे, डॉप्लर वेदर रडार आणि उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करण्यात आला आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, या प्रणालीचा लाभ शेती, जलसंपदा, अक्षय ऊर्जा, शहरी नियोजन, पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांना होणार आहे. गेल्या दशकात तीव्र हवामान घटनांच्या अंदाजामध्ये सुमारे 40 टक्के सुधारणा झाली असून चक्रीवादळांचा मार्ग, तीव्रता आणि किनारपट्टीवरील धडकेचा अंदाजही अधिक अचूक झाला आहे.
हवामानाशी संबंधित सूचना आता मोबाईल अॅप, एसएमएस, व्हॉट्सअॅप, किसान पोर्टल, दूरदर्शन आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. भविष्यात अशा उच्च-रिझोल्यूशन हवामान अंदाज सेवा देशातील इतर राज्यांमध्येही टप्प्याटप्प्याने विस्तारण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दिली आहे.