का जवानाचा मृत्यू झाला असून चार अन्य जवान जखमी झाले आहेत.
नागालँडमध्ये आसाम रायफल्सच्या वाहनाजवळ IED स्फोट; एक जवान शहीद, चार जखमी
मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या दोन जवानांचा घातपातात मृत्यू झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात नागालँडमध्ये आणखी एक गंभीर घटना घडली आहे. नागालँडमधील सुखोवी येथे आसाम रायफल्सच्या वाहनाजवळ झालेल्या संशयित IED (इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस) स्फोटात एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत.
शहीद जवानाची ओळख 28 आसाम रायफल्सचे हवालदार मोहम्मद इक्बाल अशी झाली आहे. सुखोवी परिसरात आसाम रायफल्सचे प्रशिक्षण केंद्र आणि शाळा (Assam Rifles Training Centre and School) आहे.
आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जवानांचे पथक प्रशिक्षण केंद्राच्या दिमापूरजवळील एका भागातून चुमौकेदिमा जिल्ह्यातील सुखोवी येथील दुसऱ्या भागाकडे नियमित हालचालीसाठी जात होते. त्याचवेळी हा स्फोट झाला.
अधिकाऱ्याने सांगितले की, हा परिसर अनेक वर्षांपासून शांत असल्यामुळे येथे फारशा कारवाया होत नाहीत. प्रशिक्षण केंद्राचे तीन वेगवेगळे भाग असून जवानांचे पथक नियमितपणे एका भागातून दुसऱ्या भागात जात होते.
घटनेनंतर संपूर्ण परिसराला सुरक्षा घेरा घालण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी आणि परिसरात आणखी IED आहेत का याची तपासणी करण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. खराब हवामानामुळे या कारवाईत अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
या घटनेचा नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, "चुमौकेदिमा येथील बॉम्बस्फोट हा भ्याडपणाचा प्रकार असून आपल्या समाजात अशा कृत्यांना स्थान नाही. या घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेस जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा घटनांमुळे राज्यातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात येऊ दिली जाणार नाही."
विशेष म्हणजे, हा स्फोट 6 जुलै रोजी मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या ताफ्यावर संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या घातपातानंतर नेमका आठवडाभराने झाला. त्या हल्ल्यात दोन जवानांचा मृत्यू झाला होता. संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये यावर्षी झालेला तो चौथा जीवघेणा घातपात होता.
