केलाँगमध्ये ICMRचे पहिले हाय अल्टिट्यूड रिसर्च सेंटर; हवामान बदल आणि आरोग्यावर होणार अत्याधुनिक संशोधन.


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा 11 जुलै 2026 रोजी हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पीती जिल्ह्यातील कीलोंग येथे ICMR सेंटर फॉर हाय अल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च या केंद्राची पायाभरणी करणार आहेत. आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) हे केंद्र उभारत असून, कीलोंग येथील विद्यमान फील्ड स्टेशनचे अत्याधुनिक, बहुविषयक संशोधन व क्षमता विकास केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे.

हिमालयीन प्रदेशात उंच पर्वतीय भाग, अत्यंत प्रतिकूल हवामान, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि हवामानातील वाढते बदल यामुळे सार्वजनिक आरोग्यासमोर अनेक वेगळी आव्हाने निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर कीलोंग येथील नवीन केंद्र उच्च उंचीवरील शरीरशास्त्र आणि अनुकूलन, पर्वतीय वैद्यकशास्त्र, हवामानाशी संबंधित आणि उदयोन्मुख आजार, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग, माता व बाल आरोग्य, पोषण, मानसिक आरोग्य, पर्यावरणीय व व्यावसायिक आरोग्य तसेच आपत्ती वैद्यक अशा विविध क्षेत्रांत संशोधन करणार आहे.

याशिवाय, दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म, टेलिमेडिसिन, ड्रोनद्वारे आरोग्य साहित्याची वाहतूक आणि रिअल-टाइम सार्वजनिक आरोग्य देखरेख यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे.

लाहौल आणि स्पीतीमधील हे केंद्र वर्षभर उच्च उंचीवरील आणि आदिवासी लोकसंख्येपर्यंत पोहोचू शकणार असल्यामुळे दीर्घकालीन आरोग्य अभ्यास आणि पर्यावरणीय घटकांचा आरोग्यावर होणारा परिणाम यावरील संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे केंद्र आदिवासी आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रातील राष्ट्रीय उद्दिष्टांना बळकटी देण्याबरोबरच उच्च उंचीवरील वैद्यकशास्त्राच्या जागतिक संशोधनातही योगदान देईल.

या केंद्रासाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS), संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO), हिमाचल प्रदेश सरकार तसेच देश-विदेशातील शैक्षणिक आणि संशोधन संस्थांशी सहकार्य केले जाणार आहे. यामुळे संशोधनाचे प्रत्यक्ष धोरणांमध्ये रूपांतर करण्यासाठी सक्षम परिसंस्था विकसित होईल. हा उपक्रम आरोग्य संशोधनातील 'आत्मनिर्भर भारत' अभियानासह हवामान-प्रतिरोधक आणि सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्थेच्या उद्दिष्टांनाही चालना देणारा आहे.

11 जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पारंपरिक भूमिपूजन, ग्रीन ICMR कॅम्पस उपक्रमांतर्गत स्थानिक हिमालयीन वृक्षांची लागवड, वैज्ञानिक प्रदर्शन, केंद्राच्या संकेतस्थळाचे आणि परिचयात्मक व्हिडिओचे उद्घाटन तसेच स्मरणार्थ विशेष टपाल कव्हरचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला संबंधित भागातील खासदार, आमदार, संरक्षण सचिव, हिमाचल प्रदेशचे मुख्य सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि ICMR चे वरिष्ठ अधिकारी, सशस्त्र दलांचे प्रतिनिधी, भागीदार संस्थांचे अधिकारी, शास्त्रज्ञ, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहेत.

  


Followers