भारत-ऑस्ट्रेलिया करार: पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण अधिक मजबूत; CSIR-TKDL डेटाबेसला ऑस्ट्रेलियाला मिळणार प्रवेश

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी भारताच्या पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) आणि IP Australia यांच्यात ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी (CSIR-TKDL) मध्ये प्रवेशासंदर्भात करार केला आहे. हा करार 9 जुलै 2026 रोजी मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेदरम्यान करण्यात आला.

 या कराराच्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज उपस्थित होते. संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, शिक्षण, कौशल्य विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, चित्रपट निर्मिती, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक वारशाची पुनर्प्राप्ती अशा विविध विषयांवरील द्विपक्षीय चर्चांमधून जाहीर झालेल्या 18 महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी हा एक निर्णय आहे.

CSIR-TKDL हा भारताने विकसित केलेला जगातील पहिला अशा प्रकारचा 'प्रायर आर्ट' डेटाबेस आहे. भारताच्या पारंपरिक ज्ञानावर चुकीच्या पद्धतीने पेटंट मंजूर होऊ नयेत, यासाठी या डेटाबेसची निर्मिती करण्यात आली आहे. या करारानुसार IP Australia ला ऑस्ट्रेलियातील पेटंट अर्जांची तपासणी करताना CSIR-TKDL मधील माहितीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे पेटंट तपासणी अधिक अचूक, पारदर्शक आणि प्रभावी होण्यास मदत होईल तसेच भारताच्या दस्तऐवजीकरण केलेल्या पारंपरिक ज्ञानावर चुकीचे पेटंट मिळण्याची शक्यता कमी होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांकडे समृद्ध आदिवासी ज्ञान, पारंपरिक पद्धती आणि सांस्कृतिक वारसा आहे. या ज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि बौद्धिक संपदा व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी दोन्ही देशांनी हा करार केला आहे.

या कराराच्या अंमलबजावणीवर IP Australia चे पेटंट आयुक्त अँड्र्यू विल्किन्सन, CSIR च्या महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी आणि CSIR-TKDL विभागाच्या प्रमुख डॉ. विश्वजननी जे. सत्तीगेरी देखरेख करतील.


CSIR-TKDL ची स्थापना 2001 मध्ये भारत सरकारने CSIR आणि आयुष मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमातून केली होती. या डेटाबेसमध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा आणि योग या भारतीय पारंपरिक वैद्यकीय प्रणालींतील 5.2 लाखांहून अधिक सूत्रे आणि उपचार पद्धतींची माहिती उपलब्ध आहे. ही माहिती इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश अशा पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहे, ज्यामुळे जगभरातील पेटंट परीक्षकांना तिचा उपयोग करता येतो.

ऑस्ट्रेलियासोबतचा हा करार झाल्यानंतर जगातील 18 पेटंट कार्यालयांना गोपनीयता करारांतर्गत (NDA) CSIR-TKDL डेटाबेसचा प्रवेश उपलब्ध झाला आहे. या डेटाबेसमधील पुराव्यांच्या आधारे आतापर्यंत 375 हून अधिक पेटंट अर्ज रद्द, नाकारले, सुधारित, मागे घेण्यात आले किंवा सोडून देण्यात आले असून, भारताच्या पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणात CSIR-TKDL ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

 

 

Followers