राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; महिला कचरा वेचकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

 




मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते चेंबूर येथील फाईन आर्ट्स कल्चरल सेंटर येथे महिला कचरा वेचकांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि क्षयरोग (टीबी) जनजागृती अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

हे आरोग्य शिबिर ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियानाचा एक भाग असून, महाराष्ट्र लोकभवन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात ‘नमस्ते’ (NAMASTE) योजनेचाही शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते महिला कचरा वेचकांना आयुष्मान भारत हेल्थ कार्ड तसेच वैयक्तिक संरक्षण साहित्य (PPE) किट वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश महिला कचरा वेचकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, क्षयरोगाबाबत जनजागृती करणे आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे हा आहे.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्ट पिकर्सच्या उपाध्यक्षा सुशीला साबळे, नगरसेविका आणि वॉर्ड समिती अध्यक्षा आशा मराठे, बीएमसीच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, ज्योती म्हापसेकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नरनवरे, बीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपमहानगरपालिका आयुक्त डॉ. किरण दिघावकर तसेच देवनार परिसरातील महिला कचरा वेचक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Followers