पुणे मेट्रो लाईन 3 ला पुन्हा विलंब; CMRS च्या सुरक्षा मंजुरीअभावी हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचे उद्घाटन लांबणीवर
पुणे मेट्रो लाईन 3 ला पुन्हा विलंब; CMRS च्या सुरक्षा मंजुरीअभावी हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचे उद्घाटन लांबणीवर
पुणे | पुणे मेट्रोच्या बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 चे जुलै महिन्यातील उद्घाटन आता पुढे ढकलण्यात आले आहे. मान स्टेशन ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (R K Laxman Museum) स्टेशन या मार्गावरील सेवा सुरू करण्यासाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) यांची अनिवार्य सुरक्षा मंजुरी अद्याप मिळालेली नसल्यामुळे मेट्रो सेवा सुरू होऊ शकलेली नाही.
पुणे मेट्रो हा देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर मंजूर झालेला पहिला मेट्रो प्रकल्प आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या मार्गावरील सर्व काम पूर्ण झाले असून मार्ग संचालनासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, CMRS ची अंतिम सुरक्षा मंजुरी मिळाल्याशिवाय सेवा सुरू करता येणार नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, CMRS च्या पथकाने नुकतीच पुण्यात येऊन सुरक्षा तपासणी केली आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व सूचनांची पूर्तता करण्यात आली असून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.
गेल्या महिन्यात पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अनिल कुमार सैनी यांनी सांगितले होते की, मेट्रो लाईन 3 जुलैमध्ये सुरू करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. CMRS ने दोन वेळा पाहणी करून काही सूचना दिल्या होत्या, त्या पूर्ण करण्यात आल्या असून अंतिम पाहणीनंतर मंजुरी प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा होती.
लाईन 3 च्या पहिल्या टप्प्यात हिंजवडीकडील एकूण 23 स्थानकांपैकी पहिली 12 स्थानके प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. उर्वरित स्थानके ऑक्टोबर महिन्यात कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
23.203 किलोमीटर लांबीची ही उन्नत (Elevated) मेट्रो लाईन पुण्याच्या मध्यवर्ती व्यावसायिक भागाला हिंजवडी आयटी हबशी जोडणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होणार असून हिंजवडी परिसरातील रहिवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर निवासी प्रकल्प विकसित झाले आहेत.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
पहिल्या टप्प्यात सुरू होणारी स्थानके
मेगापोलिस सोसायटी (मान)
क्वाड्रॉन बिझनेस पार्क
डोहलर
इन्फोसिस फेज 2
विप्रो टेक्नॉलॉजीज फेज 2
पॉल इंडिया
शिवाजी चौक
कोर्टयार्ड बाय मॅरियट
वाकड चौक
बालेवाडी स्टेडियम
ऑर्किड हॉटेल
रामनगर
ऑक्टोबरमध्ये सुरू होणारी स्थानके
हाय स्ट्रीट
बालेवाडी फाटा
बाणेर गाव
बाणेर
कृषी अनुसंधान
यशदा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
आरबीआय
अॅग्रिकल्चर कॉलेज
शिवाजीनगर
जिल्हा व सत्र न्यायालय
मेट्रो लाईन 3 मुळे सध्या सुरू असलेल्या लाईन 1 (पीसीएमसी ते स्वारगेट) आणि लाईन 2 (वनाज ते रामवाडी) यांच्याशीही जोडणी उपलब्ध होणार आहे. या दोन्ही मार्गांचा विस्तारही दोन्ही बाजूंनी सुरू आहे.
पुणेरी मेट्रो हा देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर मंजूर झालेला पहिला मेट्रो प्रकल्प आहे. हा प्रकल्प पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनीमार्फत विकसित केला जात असून ती टाटा समूह आणि सीमेन्स यांच्या संयुक्त उपक्रमातून स्थापन करण्यात आली आहे.
