सौश्रुतम् 2026 चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन; आयुर्वेदातील संशोधन, वैद्यकीय नैतिकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर
नवी दिल्ली | १५ जुलै २०२६: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (१५ जुलै) नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) येथे 'सौश्रुतम् 2026' या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन केले. सुश्रुत जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्यांनी AIIA मधील नव्या एमआरआय (MRI) विभागाचेही उद्घाटन केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी आयुर्वेद क्षेत्राशी संबंधित सर्वांना आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. शस्त्रक्रियेचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य सुश्रुत यांनी शतकांपूर्वी शस्त्रक्रियेची पायाभरणी करून त्या काळात वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आचार्य सुश्रुत हे अनेक जटिल आणि नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया पद्धतींचे प्रवर्तक होते. त्यांनी प्लास्टिक सर्जरी, मोतीबिंदूवरील शस्त्रक्रिया, गाठींचे उपचार तसेच कान, नाक आणि घसा (ENT) शस्त्रक्रिया अशा विविध क्षेत्रांत नवी तंत्रे विकसित केली. त्यांच्या 'सुश्रुत संहिता' या ग्रंथाने केवळ भारतीय उपखंडालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला वैद्यकीय क्षेत्रात नवी दिशा दिली.
राष्ट्रपतींनी सांगितले की, मानवी कल्याणासाठी उपयुक्त असलेल्या आपल्या परंपरागत ज्ञानाचा काळानुरूप विकास करून त्याचा समाजाच्या हितासाठी उपयोग करणे आवश्यक आहे. आयुर्वेदाची सर्वांगीण जीवनदृष्टी ही मानवजातीसाठी मोठी देणगी असून, हे प्राचीन ज्ञान आजच्या काळातही उपयुक्त आणि प्रभावी राहावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
त्यांनी नमूद केले की, भारत सरकारने आयुर्वेद आणि योगाला जागतिक स्तरावर नव्या उंचीवर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. शस्त्रक्रियेच्या प्राचीन आयुर्वेदीय परंपरेला आधुनिक वैज्ञानिक निकषांवर सिद्ध करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. प्रमाणित दस्तऐवजीकरण, डिजिटल आरोग्य व्यवस्थेचा समावेश आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन तंत्रांचा प्रभावी वापर केल्यास आयुर्वेदाला जागतिक स्तरावर अधिक व्यापक मान्यता मिळेल, असे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या तरुण विद्यार्थी आणि संशोधकांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आयुर्वेदाचे भविष्य त्यांच्या हातात आहे. त्यांनी जिज्ञासा, प्रामाणिकपणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या आधारे व्यावहारिक संशोधन व उच्च दर्जाचे वैज्ञानिक पुरावे निर्माण करण्याचे आवाहन केले. आवश्यक तेथे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास संकोच करू नये, असेही त्यांनी सांगितले.
यासोबतच त्यांनी आचार्य सुश्रुत यांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करत वैद्यकीय नैतिकता आणि रुग्णसेवेप्रती करुणा याबाबत कायम कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
राष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला की, 'सौश्रुतम् 2026' या परिसंवादातील चर्चा आणि विचारमंथनातून नवीन ज्ञानाची निर्मिती होईल तसेच आयुर्वेदीय शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत होईल. अशा उपक्रमांमुळे सर्वांगीण आरोग्यसेवा व्यवस्थेत आयुर्वेदाचे योगदान अधिक प्रभावी होण्यास मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारतासह विविध देशांतील नामवंत शल्यचिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले आहेत.